Wednesday, March 28, 2018

जिजाऊंचा शिवबा तू
राजा रयतेचा
जाणता राजा तू
सखा मावळ्यांचा
तूझ्या शौर्याचा झेंडा भगवा
चला रायगडी करू मुजरा

गुलामीच्या बेड्या तू 
तोडल्यास ना
आया बाया बाप लेका
जपलंस ना
तूझ्या मायेचा रंग भगवा
चला रायगडी करू मुजरा


शिवभक्त येती गडा 
तूला ललकारा
बळ दे निश्चय दे
उभ्या महाराष्ट्रा
आम्हा ताराया झेंडा भघवा
चला रायगडी करू मुजरा

स्वराज्य व्हावे जरी
असे श्रींची इच्छा
तरी जिजाऊँची होती
मनोमनी खास
तिच्या दृष्टीचा रंग भगवा
चला रायगडी करू मुजरा

जेष्ठ शुद्ध त्रयोदशी 
तिथी मानाची
राज्याभिषेक राजांचा
घटी मोलाची
तूझ्या धैर्याचा रंग भगवा 
चला रायगडी करू मुजरा

- दीपक शिंदे

Saturday, March 11, 2017

महाडच्या ग्रामदेवतेची होळी व गवळआळीतील जळक्या लाकडांची लढाई

(दीपक शिंदे, महाड, 8983918989)

      कोकणातला शिमगोत्सव हा अनेक पारंपारिक सणांपेकी प्रसिद्ध असा सण. यातील होळी हा सण लोककलेशी निगडीत असा सण. यातील लोकगीते म्हणजे फाग, हाकारा, देवाचे गा-हाणे, फाकदे म्हणजेच फोदे पर्यंतच्या सर्व शब्दरचनेचा संबंध लयीशी येतो. यातील विविध पद्धती या तत्कालीन कथांवर आधारीत असल्याचे दिसून येते. महाडच्या ग्रामदेवतेची होळी आणि गवळआळीतील देवदानवांची लढाई ही अशीच पुरातन कथांवरून आलेली एक पद्धत असल्याचे दिसून येते.
      होळी पौर्णिमेच्या आधी सात-आठ दिवस साळीवाडा नाका येथील होळीच्या जागेवर खड्डा खणला जातो. जाणत्या ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली रोज लहान मूलेच सध्या होळी लावतात. हळूहळू पौर्णिमेचा दिवस येतो. होळी पौर्णिमेला दुपारपासून सारेचजण होळीची तयारी करत असतात. पेंढ्यासाठी खेडेगावात बैलगाडी सांगितली जाते. सायंकाळच्या सुमारास काजळपूरा तर्फे मुख्य हळकुंड वाजत गाजत आणला जातो. बैलगाडीतून निशाण लावलेला हा हळकुंड आणताना खालूच्या तालावर लेझीमनृत्याची एक परंपरा आहे. शहरातील जवळपासच्या सर्वच आळीतून वाजतगाजत आणलेले हळकुंड येथूनच त्यात्या ठिकाणी नेले जातात. त्याचवेळी ग्रामदेवतेच्या या होळीकरीता काही लाकडे त्या त्या आळीकडून येथे दिला जातात. साधारण साडे नऊ वाजेपर्यंत ही होळी रचली जाते. सावरीच्या झाडाचा खोड हा मुख्य हळकुंड म्हणून पहिला त्या खणलेल्या खड्ड्यात उभा केला जातो. मग सभोवती विविध टाकाऊ व जळाऊ वस्तू, पुठ्ठे, पेढा रचीत होळी सजली जाते. ग्रामदेवतेचे मुख्य पुजारी गुरव, जंगम, महाजन यानी सांगितलेल्या वेळेनुसार ग्रामदेवता आपल्या निशाणीसह वाजतगाजत साळीवाडा नाका येथे येते. महाडकर नागरीक व विरेश्वर देवस्थानचे सरपंच व इतर ट्रस्टींसोबत जाकमातेची ही छोटेखानी मिरवणूक देखणी असते. जाकमातेचे निशाण घेतलेले गुरव, बाजूला पावा घेतलेला मानकरी, पांढरे टोपी घातलेले गावकरी, विरेश्वर देवस्थानचे सरपंच आणि अग्रभागी असतात नव्या पिढीतील ढोल वाजविणारे शिलेदार. साळीवाडा नाक्यावरील कै. वैद्य ना. तू. पावले यांच्या दारात जाकमातेचं निशाण चौरंगावर ठेवलं जातं. रांगोळी रेखाटल्याने याचं पावित्र्य वाढलेलं असतं. गुरव, जंगम आणि महाजन यांच्या शब्दोच्चारात होळीला रचलेल्या लाकूड व पेंढ्यासह होळीची पूजा केली जाते. सभोवती महाडकरांचा गराडा वाढलेला असतो. डाॅ. देशमुख यांच्या निवासस्थानासमोर काजळपूरातील पुरुष व महिलांची गर्दी झालेली असते. तर दुसरीकडे राजवाडकर हाॅटेलसमोर जुनीपेठ व महाडमधील जेष्ठांनी गर्दी केली असते. तरूण शिलेदार होळीच्या भोवती फेर धरण्यात अधीर झालेले असतात. देवीचे निशाण, ध्वज, वाद्ये यांचा फेर सुरू होतो. आणि फागेचे सूर आळवले जातात. 
पहिला उदय फाग देवा – तुम्हा कुठे झाला..... जेष्ठ नागरीक या सूरात दंग होतात आणि गाण्यातले पारंपारीक शब्द कान तृप्त करतात.  पायाचा ठेका आणि हात वर करून कमरेला मारलेली गिरकी या संस्कृतीची पारंपारीकता दाखविते. हा नृत्य प्रकार म्हणजे नृत्य कलाविष्काराची खरं तर जननीच. प्रत्येकाच्या हातात घरातून कुलस्वामीनीचा नारळ असतो. अतिशय भाविकतेने या नारळाकडे एक नजर प्रत्येकाची जाते. आमच्या कुटुंबावरचं संकट होलिकेमाते नष्ट कर गं अशी मनात एक गा-हाणं नकळत म्हटलं जातं. दरम्यान मानकरी व सेवेकरांच्या हस्ते होळी प्रज्वलीत केली जाते. हळू हळू होळी आपलं अजब रूप धारण करते. पुढे गेलेले पाय काहीसे मागे येतात. क्षणात तेथील तापमानात वाढ झालेली असते. सा-यांच्या माना वर जातात. होळीचा अग्रभाग पाहण्यात सार्यांची उत्सुकता वाढलेली असते. एकेक जण आपले मनात मनसवलेले नारळ होलिकेमातेला अर्पण केले जातात.
       आपला आदिमानवाने रचलेल्या या देवता खरं तर मानवाला सुरू झालेल्या रोगांपासून निर्माण झाल्या असाव्यात. रोग आला की त्याला नाव देत तिची आराधना करून तो रोग बरा करण्याची ती प्राचीन अवस्था होती. खरजूदेवी, खोकलूदेवी, गोलमदेवी, गोवराची शितळादेवी अशी प्राचीन देवस्थाने या अशा रोगांवरूनच आल्याचे अभ्यासकांचे मत आहे. अशीच ही उष्णतेची देवी होलिकादेवी. हिवाळ्यानंतर सुरू होणा-या उष्णहवामानात होणा-या अनेक रोगांपासून आम्हाला दूर ठेव म्हणून तशी उष्णता निर्माण करून तिला शांत करण्याची ही होळीची पद्धत असावी असं म्हणायला एक आधार आहे. 
      महाड शहरातील ही ग्रामदेवतेची मानाची पहीली होळी. त्यानंतर शहरातील प्रत्येक आळीतील होळी प्रज्वलीत होऊ लागतात. काही वर्षापासून होळीतील भाजका नारळ काढून तो खाण्याची एक पद्धत सुरू झाली आहे. नारळ टाकल्यापासून तो काढण्यासाठी चाललेली तरूणांची धडपड म्हणजे एक शक्तीप्रदर्शनाचा खेळ झालाय. त्याकरीता काही टोळकं काठ्या घेऊन तयारच असतात. मोठ्या खुबीने काठीने होळीतील नारळ बाहेर ओढला जातो. काळा झालेला आणि वाफाळलेला नारळ आपटला जातो. गरम गमर पाण्याची चिळकांडी त्यातून बाहेर येते. काही थेंब अँगावर पडतात. जरासं भाजल्यासारखं होतं. पण लक्ष त्या नारळाकडे असल्याने त्या चटक्याची जाणीव होत नसते. भाजलेलं खोबरं खात तरूणांचं टोळकं कित्येक तास बसलेले असतात.
गवळआळीतील जळक्या फाट्यांची लढाई
      ग्रामदेवता जाकमातेच्या या होळीच्या दरम्यान गवळ आळीत होळीची तयारी सुरू झालेली असते. गेले काही वर्ष गवळ आळीने हळकुंड नाचवीत आणण्याची प्रथा बंद केली आहे. हे खरंच नवसुधारवादाचे द्योतक आहे. ग्रामदेवी जाकमातेची साळीवाडा नाक्यावर लागलेल्या होळीनंतर गवळ आळीच्या मध्यावर रचलेल्या होळीच्या जागेवर इथले गवळी समाजाचे असलेले पाटील हे वतनदार येतात. पारंपारीक फाग म्हणजे होळीची गाणी म्हटली जातात. सुंदर रांगोळी... अलोट गर्दी आणि फागेचा मधूर कोरस यामुळे हा सोहळा रंगत असतो.....
पहिला उदय फाग देवा – तुम्हा कुठे झाला
कलकीच्या बेटी एक कोम जनमेला - लवा लवा कोम गगनासी गेला
तो - कोम गेला सालीयाच्या घरा - सालीया दादानी कोम सुतानी मर्दिला
तो - कोम गेला सोनाराच्या घरा – सोनार दादानी कोम सोन्यानी मर्दिला
तो – कोम गेला गवळ्याच्या घरा – गवळ्या दादानी त्याचा संडा मुडा केला. सुतार दादानी त्याच्या पालख्या जोडिल्या
ते – पालखी कोण देव बसं – ते पालखी गणपती देव बसं
सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं
ते – पालखी कोण देव बसं ते पालखी चांडकाय देव बसं
सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं
ते – पालखी कोण देव बसं – ते पालखी जाकमाता देव बसं
सोनियाचं दांड मारू ठसं
ते – पालखी कोण देव बसं – ते पालखी महादेव देव बसं
सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं
ते – पालखी कोण देव बसं – ते पालखी कालकाय देव बसं
सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं
कालियाम डांग तुझी काली डवली फिरली
सांग सांग पार देवा कोन राना गेली
हाच पाणी पियालीनी ह्याच राना गेली
ऐकीच्या गळी आहे नवसे हार
राम लक्ष्मण होळी लावायला या रे फो दे
   लोकगीताचा शेवट होतो आणि होळी लावली जाते.  अगोदरच होळीच्या टोकावर कोंबडीचे एक पिलू लावलेले असते. होळीच्या ज्वालाने त्या पिल्लाला लपेटल्यानंतर आळीतील एक गट ते भाजलेले पिलू काढून सावित्रीच्या घाटावर नेतात. होळीच्या स्थानापासून धावत प्रभूराम मंदिराच्या शेजारील गल्लीने नदीच्या किना-याकडे  घाटाच्या पायरीकडे नेऊन ते खातात. नदीवर देखील छोटी होळी पेटवली जाते. ती जळकी लाकडे तयार असतात. काही सेकंदात ती जळकी लाकडं पिल्लू नेणा-या गटाकडून गवळ आळीतील त्या होळीच्या दिशेने फेकली जातात. तर होळीच्या येथून जळकी लाकडे विरूद्ध दिशेकडे फेकली जातात. जवळ जवळ तीस ते पस्तीस सेकंद हे युद्ध चालतं. जळकी लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकताना कोणाच्या अंगाला स्पर्शही करतात. पण त्याची कोणतीही भिती येथील ग्रामस्थांना नसते. दुतर्फा घरातून हे युद्ध पाहणे म्हणजे एक कुतूहल झालेले असते. प्रभुराम मंदिरासमोर व देशमुखांच्या गल्लीत काही महाडकर हे जळक्या लाकडांचं युद्ध पाहायला आलेले असतात. मग दोन्हीकडचे माणसे समोरासमोर येत काठीला काठी लावल्यावर हा पारंपारीक खेळ थाबतो. यानंतर कोणाला लागलं का अशी विचारपूस सारेच जण करत असतात. जास्त लागलेल्यांवर काही उपायही सुरू असतात. पण अजूनतरी यात कोणी जखमी झालेला नसल्याची माहिती देखील याचवेळी मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. आमच्या होळीची ही परंपरा आहे असं म्हणत होळीने उजळलेली रात्र पुन्हा गडद होत जाते. 
महाडच्या या दोन्ही होळी पाहायला आपण
होळी पौर्णिमेला नक्की महाडला या.....