रस्ता नाही, शाळा इमारत निकृष्ट आणि अंगणवाडीही नाही
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिक्षणासाठी ग्रामस्थांचा आटापिटा
महाड - छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळेवाडी येथील प्राथमिक शिक्षणाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. शाळेची इमारत संपूर्ण गळत असल्याने मुलांना शाळेत बसण अवघड झाले आहे. शाळेच्या भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांच्या मनात साशंकता आहे.
महाड तालुक्यातील रायगडवाडीमधील नेवाळेवाडीतील ही शाळा 2005 साली बांधण्यात आली. शाळेला स्लॅबची मंजूरी असताना देखील शाळेवर पत्रे टाकण्यात आले. या शाळा इमारतीमध्ये ब-याच प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे येथून सांगितले जाते. सोसाट्याच्या वा-यापुढे हया इमारतीवरील पत्रे तग धरू शकले नाहीत. 2007 च्या फयान वादळामध्ये यावरील पत्रे पाचशे मीटर अंतरापर्यत उडाले होते. शाळेच्या या इमारतीची पुन्हा दुरूस्ती करूनही शाळेची गळती सुरूच आहे. शिक्षक व ग्रामस्थ यांनी मिळून पत्र्यावर प्लॅस्टीक टाकून त्यावर दगड रचून संरक्षण केले आहे. तरीही भिंतीतून पाणी गळून मुलांना शाळेत बसण अवघड झाले आहे. शाळेचे बाधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने शाळेच्या इमारतीला आता तडे जात असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
रायगडच्या पायथ्याशी किमान ३०० लोकसंख्या असलेली या नेवाळे वाडीत सर्व रहिवाशी हे धनगर समाजाचे असून शेती व दुधदुभती जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. या गावाकडे येण्यासाठी किमान २ कि मी पायपीट करावी लागते. पावसाळ्यात या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था होते. रायगडवाडी पासून 700 मीटर पर्यंतचा रस्त्याचे खडीकरण झाले असून पुढील दीड किलोमीटरचा रस्ता म्हणजे दगड व चिखलाची पायवाटच आहे. अतिवृष्टीच्या काळात बाजूच्या गावातील मुलांना शाळेत येणे कठीण जाते त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पटसंखेत घट होत आहे परिणामी शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे.
अंगणवाडी देखील नाही
येथील प्राथमिक शिक्षणाची अवस्था पाहताना या नेवाळेवाडीमध्ये बालवाडीसाठी 25 मुले अंगणवाडीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले. गेली चार वर्षे येथील ग्रामस्थ अंगणवाडीची मागणी करीत आहेत परंतु येथे महाड पंचायत समिती अंगणवाडी देऊ शकली नाही. त्यामुळे अंगणवाडीच्या मुलांसाठी असलेल्या शासकीय फायद्यांपासून येथील लहान मुले वंचित राहिली आहेत.
केंद्रशिक्षकाची वर्षातून एकदाच भेट
नेवाळेवाडीतील या शाळेत दोन शिक्षक असून दोन्ही शिक्षकांना येथे येण्यासाठी पराकाष्टा करावे लागते. या नेवाळेवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुखांची वर्षातून एकदाच व्हिजीट झालेली दिसते. नोंदवहीतील नोंदीप्रमाणे यंदा जून महिन्यात तर 2012 सालात एप्रिल महिन्याव्यतिरिक्त 2012 सालात केंद्रशिंक्षक या शाळेत आलेलेच नाहीत. यामुळे या शाळेच्या इमारतीच्या पडझडीची व येथील इणारतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत शासनदप्तरी कोणतीही नोंद नाही.
रायगड किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी याच राजधानीजवळील ही नेवाङेवाडीच्या शाळेची ही अवस्था आहे. ही वाडीच पूर्णत दुर्लक्षित झाली आहे. या वाडीला जोडून नगरभुवर ते खर्डी हा रस्ता झाल्यास येथील पर्यटनामध्ये देखील वाढ होईल परंतु येथे कायम दुर्लक्ष केल्याने आता नेवाळेवाडी, नगरभुवन सारख्या गावात तरुणांचेही स्थलांतर सुरत, बडोदा याठिकाणी झाले आहे. त्यामुळे स्थिरावलेल्या वयस्कर ग्रामस्थांचे व लहान मुलांचे हाल बघवत नाहीत. परंतु या ठिकाणी सुविधा पुरविण्यात लोकप्रतिनिधीसह स्थानिक व राज्य शासनही कमी पडेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे.









