Tuesday, July 2, 2013

दीपक अर्जुन शिंदे पत्रकार - सह्याद्री वाहिनी.... रायगड भूषण पुरस्कार प्राप्त...... सह्याद्री वाहिनीचा लक्स माणिक रत्न पुरस्कार 2012



 जिद्द माणसाला यशस्वी बनविते हे आमचेे मित्र दीपक शिंदे यांच्या धावपळीकडे पाहिले की पटते. गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दीपक शिंदे यांनी बसविलेला जम पाहिला की त्यांचे कौतुक करावेसे वाटते. दोन्ही पायाने अपंग असूनही गेली ११ वर्षे सह्याद्री वाहिनीचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी अनेक अडचणींवर मात करुन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, गड संवर्धन, साहस, पर्यावरण जगतातील अनेक घटना, विविध व्यक्तिमत्वांवर प्रकाश टाकला आहे. त्याकरिता प्रसंगी कितीही चालावे लागले तरी त्यांनी माघार घेतली नाही. त्याचे फळ म्हणजे त्यांना नुकताच मिळालेला लक्स सह्याद्री माणिक सन्मान पुरस्कार. सह्याद्री वाहिनीचा हा वृत्तकथा व वृत्तसंकलनातील सर्वोच्च सन्मान दीपक शिंदे यांना मिळाला, त्यामुळे त्यांच्याविषयी असलेला अभिमान बळावला.
२ जुलै १९६४ रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथेे अर्जुन बाबाजीराव शिंदे या पोलिस खात्यातील अधिकार्‍याच्या कुटुंबात दीपक शिंदे यांनी जन्म घेतला. शिंदे कुटुंब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदिवसे या गावातील. पोलिस खात्यातील नोकरीमुळे त्यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथेच मुक्काम झाला. दीपक शिंदे तीन वर्षांचे असताना त्यांच्या दोन्ही पायांना पोलिओ झाला. परंतु कणखर वडिलांमुळे दीपक यांचे आयुष्य दुःखमय झाले नाही. अतिशय परिश्रम घेऊन दीपक यांच्या वडिलांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे धाडस दिले. दीपकला एक भाऊ आणि दोन बहिणी. दोन्ही बहिणी कबड्डी, खोखोमध्ये प्रविण असल्यामुळे घरातच व्यायामाचे बाळकडू मिळाले. त्यांना वडिलांनी सायकल, पोहणे आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहित केले. दीपक शिंदे यांनीही व्यायामास सुरुवात केली आणि आपल्या पोलिओने आलेल्या अपंगत्वावर मात केली. प्राथमिक शिक्षण पाली व श्रीवर्धन व त्यानंतरचे पदवीपर्यंतचेे सारे शिक्षण महाड येथे पूर्ण केले. स्वतःचा स्क्रीन प्रिटींगचा व्यवसाय प्रथम ठाणे येथे नंतर महाड येथे सुरु करुन छपाई कलेचा वेगळा ठसा महाड परिसरात उमटविला. कॉम्प्युटराईज्ड प्रिटींगचा पहिला व्यवसाय महाड येथे सुुरु करण्याचा मान त्यांना पटकावला आणि मंडणगड, खेड, रायगडमध्ये छपाईसाठी वेगळे नाव मिळविले. त्यानंतर १९८९ मध्ये महाडमध्ये महाड वार्ता वृत्तवाहिनीचेे संचालक म्हणून काम पाहिले. महाडमधील संजय भुस्कुटे आणि दीपक शिंदे यांनी पत्रकारितेतील महाड वार्ता या खासगी वाहिनीमार्फत आपली मुहूर्तमेढ सुरु केली आणि आज दोघांनीही याच क्षेत्रात आपले वेगळे व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केले आहे. १९९९ मध्येे दीपक शिंदे यांना सह्याद्री वाहिनीचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व मिळाले आणि छपाई व्यवसायाला मिळविलेली उत्तुंगता तशीच कायम ठेवत इलेक्ट्रॉनिक्स चॅनेलमधील आपली कारकिर्द सुरु केली. चांदोरे गावातील प्राचीन मूर्तीचा साठा, महाड एमआयडीसी प्रकल्पातील अनेक समस्यांवर प्रहार केला. याच दरम्यान जेसीज क्लब व नंतर किशोर धारिया यांच्या हिरवळ प्रतिष्ठानची धुरादेखील दीपक शिंदे यांच्याकडे सर्वांधक होती. त्या माध्यमातून धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रमामुळे त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टकोन बदलत चालला आणि ते समाजातील विविध अन्यायकारक घटनांकडे अधिक सजगतेने पाहू लागले. जाखमाता नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा संवाद घडवून आणण्याचा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी अनेक वेळा केला आणि नागरिकांना काय हवंय आणि लोकप्रतिनिधींनी काय करायला हवे याची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. आजही वृत्तसंकलन करताना त्या त्या समस्येबद्दल अधिक अभ्यासपूर्ण मांडणी करत एखाद्या अधिकार्‍याच्या डोळ्यात अंजन घालताना दीपक शिंदे यांचा अवतार अनेकांना भारावून जातो. वृत्त संकलनाच्या निमित्ताने चिपळूणचे प्राणीमित्र भाऊ काटदरे, महाडमधी पक्षीप्रेमी प्रेमसागर मेस्त्री, दापोलीतील दिलीप कुलकर्णी यांची ओळख झाली आणि शिंदे यांचा पर्यावरणाकडे ओढा वाढत गेला. गडकिल्ल्यांच्या वृत्तसंकलनाच्या निमित्ताने महाडमधील सुरेश पवार यांची अनोखी मैत्री जमली, राजकीय क्षेत्रात उल्का, महाजन, साकव संस्थेचे अरुण शिवकर, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील गजानन खातू, श्रीप्रकाश अधिकारी यांचा परिचय झाला आणि एखाद्या सशक्त तरुणाला लाजवेल असा दीपक शिंदे यांचा प्रवास सुरु झाला. कधी रायगड, कधी पद्मदुर्ग तर कधी प्रतापगड अशी कधी गड स्वच्छतेची मोहिम तर कधी जागर तर कधी रायगडवरील छत्रपत शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळ्याचा वर्धापनदिन. एकीकडे वृत्तसंकलन तर दुसरीकडे जागृती करणारा आमचा मित्र दीपक शिंदे यांची अपंग म्हणून ओळख करुन देणे हे खरेच चुकीचे ठरेल. परंतू याचा असा उल्लेख केला तर इतर अपंगांसाठी दीपक शिंदे एक आदर्श ठरतात म्हणून हा प्रपंच.
दीपक शिंदे केवळ पत्रकार नाही तर संवेदना जागृत करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. सध्या ते महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे विश्वस्त, माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकता स्थानिक सदस्य आहेत. कोकण भूमी प्रतिष्ठानचे रायगड प्रतिनिधी म्हणून पर्यटन जागृतीसाठी काम करताहेत, लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या एनएसएस कमिटीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. कोकण कडा मित्र मंडळाच्या दुर्ग संवर्धनात मार्गदर्शक, रायगड प्रेस क्लबचा मार्गदर्शक, पॅट्रॉन या विमा व्यवसायातील समूहात डीएम अशा विविध स्तरात त्यांनी आपले पाय रोवलेत. विविध डॉक्यूमेंटरीज, शॉर्ट फिल्म बनविणे हा केवळ छंद नसून ते एक प्रोफेशन करण्याचा प्रयत्न दीपक करीत आहेत आणि म्हणूनच त्यांना सह्याद्री वाहिनीचा मिळालेला पुरस्कार सार्‍या पत्रकार मित्रांच्या दृष्टीने अधिक अभिमानस्पद आहे. त्यांच्या या कार्याला, त्यांच्या या जागराला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
 - गिरीश साळी, महाड़ 

No comments:

Post a Comment